नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न मुस्लिम राष्ट्रीय मंचने पाकिस्तान उच्चायुक्तांना दिलेलं इफ्तार पार्टीचं निमंत्रण मागे घेतलं आहे. जम्मू काश्मिरमधील पंपोर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी, पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मुस्लिम राष्ट्रीय मंचने बासित यांना फोन करुन, पार्टीला येऊ नका, असं सांगितलं.
मुस्लिम राष्ट्रीय मंचने दोन जुलैला दिल्लीत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. त्यासाठी बासित यांच्यासह विविध मुस्लिम राष्ट्रांच्या राजदुतांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र आता बासित यांना येऊ नका, असं सांगण्यात आलं आहे.
बासित यांचं वादग्रस्त वक्तव्य
जम्मू-काश्मीरमधील पंपोरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले. शनिवारी झालेल्या या हल्ल्याबाबत बासित यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना बासित म्हणाले, "जम्मू काश्मिरचा प्रश्न भारत-पाकिस्तानमध्ये आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवाण्याची दोन्ही देशांची तयारी आहे. दोन्ही देश चर्चेसाठी प्रत्यक्षात तयार होतील अशी एक वेळ येईल"
मात्र पंपोर हल्ल्याबाबत पुन्हा विचारणा झाल्यावर बासित म्हणाले, "मला जे सांगायचं होतं, ते मी सांगितलं. आज इफ्तार पार्टी आहे. लेट्स एन्जॉय".
बासित यांच्या पार्टीत फुटीरतावाद्यांची हजेरी
दिल्लीत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी शनिवारी आयोजीत केलेल्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांनी हजेरी लावल्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ची जंगी तयारी
दरम्यान मुस्लिम राष्ट्रीय मंच’ने इफ्तार पार्टीसाठी जय्यत तयारी केली आहे. मंचने यापूर्वीही अनेक इफ्तार पार्टी दिल्या आहेत. मात्र यावेळी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ने आपल्या सदस्यांना देशभरात इफ्तार पार्टी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच यामध्ये सर्वधर्मीयांना आमंत्रित करण्यास सांगितलं आहे. यासाठी विविध मुस्लिम देशांच्या राजदुतांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
संघाकडून इफ्तार पार्टी, पाकसह अनेक मुस्लिम राष्ट्रांना निमंत्रण
जम्मूत दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद, तर 17 जवान जखमी
दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांची हजेरी
VIDEO: जवानांच्या गाडीसमोर उभं राहून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या