नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही संबंध सुधारताना दिसत नाहीत. त्याचसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना मोठं विधान केलं. “भारताला पाकिस्तानपासून सावध राहण्याची गरज आहे. दहशतवाद्यांसंबंधी भारताची भूमिका आता जगालाही समजू लागली आहे.”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘टाईम्स नाऊ’च्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला की, “आता या क्षणी लक्ष्मण रेषा काय आहे, जी पाकिस्तानने ओलांडली नाही, तर राजकीय स्तरवारील चर्चा कशी होऊ शकते?”
या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानसोबत लक्ष्मण रेषेची चर्चा कुणाशी कराल? निवडून आलेल्या सरकारसोबत की अन्य कोणाशी? त्यामुळे भारतालाच आता सावध राहण्याची गरज आहे. प्रत्येक क्षण सतर्क राहावं लागेल आणि यामध्ये अजिबात ढिसाळपणा चालणार नाही. मात्र, माझे सातत्याचे प्रयत्न आणि लाहोरमध्ये जाणं, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतात बोलावणं, यावरुन आता जगालाही कळू लागलं आहे की, भारताची भूमिका काय आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावर उत्तर देणं पाकिस्तानला कठीण जात आहे. जग कधीच भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला समजून घेत नव्हतं. जगाला कायम वाटायचं की, भारताच्या कायदा-सुव्यवस्थेतच दोष आहेत. मात्र, आता जगाला भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका ऐकून घ्यावी लागते.”