नवी दिल्ली: नौदलाच्या जवानांनी पहिल्याच प्रयत्नात हिमालयातील सर्वात उंच असणारं हिमशिखर सतोपथ (7075 मी.) आणि यासोबत आणखी एक शिखर सर करुन मोठ्या डौलानं भारताचा तिरंगा फडकवला.
हे सर्व जवान लेफ्टनंट कमांडर विनीत दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली 23 मे रोजी मुंबईहून उत्तरकाशीमधील नेहरु गिर्यारोहण संस्थेमध्ये जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर हे बाराही जवान दोन जूनला बेस कॅम्पला पोहचले. त्यानंतर तिथून त्यांनी आपलं सामान 4950 मी. उंच अॅडव्हान्स बेस कॅम्पवर पोहचवलं. त्यानंतर त्यांनी हिमालयातील सर्वात उंच ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरु केला. या कॅम्पचे प्रमुख लेफ्टनंट कमांडर विनीत दोषी यांच्यासह या जवानांनी 16 जूनला सतोपंथ शिखर गाठलं. शिखर गाठताच त्यांनी तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकवला.
त्यानंतर हे बहाद्दर इथंच थांबले नाहीत. तर सतोपंथहून खाली उतरताना त्यांनी 6020 मी उंच असणारं आणखी एक शिखर सर केलं. इथंही त्यांनी डौलानं तिरंगा फडकवला. त्यानंतर त्यांनी बुधवारी उत्तरकाशी गाठलं.
या यशस्वी गिर्यारोहणानंतर लेफ्टनंट कमांडर विनीत दोशी यांनी सांगितलं की, परतताना त्यांनी आणि त्यांच्या सदस्यांनी बेस कॅम्प वासुकीताल इथं स्वच्छता अभियान पार पाडलं. पर्यटकांनी मागे सोडलेला तब्बल 45 किलो कचरा जमा करुन वन विभागाच्या बॅरिअरमध्ये जमा केला. त्यामुळे गिर्यारोहणासोबतच या जवानांनी स्वच्छतेचाही संदेश पर्यटकांना दिला आहे.