नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे मोर्चे हे प्रतिमोर्चे नसतील. तर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ नये आणि दलित-मराठा ऐक्य व्हावं, यासाठी आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.


मराठ्यांच्या मोर्चांविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नये, असं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मोर्चे काढायचे असते तर यापेक्षाही मोठे काढले असते. कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मोर्चा काढायला हरकत नाही, पण त्याच अॅट्रॉसिटीचा विषय का आणला असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना मोर्चे काढायचे आहेत, त्यांनी काढावेत, असं आठवले म्हणाले.

तसंच अॅट्रॉसिटीची एवढी भीती असेल तर दलितांवर अत्याचार करु नका. अॅट्रॉसिटी कायद्यात बदलासाठी चांगल्या सूचना आल्या तर त्याचा जरुर विचार केला जाईल, असंही आठवलेंनी नमूद केलं.

शिर्डीत 7 ऑक्टोबरला मराठा-दलित ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली असून मराठा महासंघ, शिवसंग्राम संघटना यांनाही आमंत्रण असल्याचं आठवलेंनी सांगितलं.