चेन्नई : 'दोघात तिसरा, आता सगळं विसरा' ही म्हण सर्रासपणे वापरली जाते. भावी पत्नीचं श्वानप्रेम आपल्या वैवाहिक आयुष्याच्या आड येण्याच्या भीतीने एका तरुणाने नियोजित वधूला कुत्र्यापासून दूर राहण्यास सांगितलं. मात्र या अनाहूत सल्ल्यामुळे नाराज तरुणीने थेट लग्नालाच नकार दिला आहे.


चेन्नईतील ही घटना सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे करिष्मा वालिया या तरुणीने संबंधित तरुणासोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही फेसबुकवर पोस्ट केले आहेत.


'आमचं अरेंज मॅरेज होणार होतं. मला स्थळ म्हणून आलेला मुलगा सुस्वभावी वाटला. दिसायला-वागायला बरा होता, एकूणच त्याची पार्श्वभूमीही चांगली होती. मात्र जेव्हा मी माझ्या कुत्र्यालाही सासरी आणणार असल्याचं सांगितलं, तेव्हा त्याचा नूरच पालटला.' असं करिष्मा सांगते.



'मला कुत्र्यासोबत बेड शेअर करायचा नाही. माझ्या प्रेमाआड कुत्रा आलेला मला चालणार नाही. माझ्या आईलाही कुत्रे फारसे आवडत नाहीत. कदाचित कुत्र्यांची आवड ही तुझ्या आयुष्यातली तात्पुरती मनस्थिती असेल. त्यामुळे पुन्हा विचार कर.' असं त्याने करिष्माला व्हॉट्सअॅपवर सांगितलं.






मी कुत्र्याला सोडू शकत नाही, ही तात्पुरती आवड नाही, असं करिष्माने ठामपणे सांगताच त्याने तिला स्पष्ट शब्दात 'कुत्र्याशीच लग्न कर' असा सल्ला दिला. करिष्माने तरीही 'आपल्यातलं नातं नीट निभावू शकलं नाही, म्हणून उद्धटपणे वागायची गरज नाही' असं सुनावलं.





'तो अजूनही मला मेसेज करतो. कुत्रा हे आयुष्यातलं प्राधान्य असणं, किती हास्यास्पद आहे, असं सांगतो. मात्र मी कधीच त्याला रिप्लाय केला नाही' असं करिष्मा आनंदाने सांगते. माझ्या आईने मला आधी पुनर्विचार करायला सांगितला, मात्र आता तिलाही माझा अभिमान वाटतो, असं करिष्मा म्हणते.