नवी दिल्ली: हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला दलित नव्हता. तसंच विद्यापीठाने केलेल्या कारवाईमुळे त्याने आत्महत्या केली नाही, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.


रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध लावायचा होता.

रोहित अनेक समस्यांनी ग्रस्त होता, नैराश्येपोटी त्यानं आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या सुसाईड नोटमधून समोर आल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

रोहितप्रकरणावरून संपूर्ण देशभरात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट उठली होती, मोदी सरकार दलितांच्या विरोधात असल्याचे आरोपही करण्यात आले होते. तसंच हैदराबाद विद्यापीठातील आंदोलनाचे लोण दिल्लीतही पोहोचलं होतं.

मात्र रोहित दलित नसल्याचा दावा अहवालात केल्यानं तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींना क्लिनचीट मानली जात आहे.

काय होतं नेमकं प्रकरण?

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुलाने जानेवारी 2016 मध्ये आत्महत्या केली होती.

केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींना एका पत्र लिहून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ हे जातीयवादी, उग्रवादी आणि राष्ट्रविरोधी राजकारणाचा अड्डा झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या पत्रानंतरच विद्यापीठ प्रशासनाने पाच विद्यार्थ्यांची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली. यापैकी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी बंडारु दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. मात्र दत्तात्रेय यांनी त्या पत्राचा आत्महत्या केलेल्या रोहितशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटांचा दोषी याकूब मेमनला फाशी झाली त्यावेळी माकपशी संबंधित विद्यार्थी संघटना एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर काही दलित विद्यार्थ्यांवर दुसऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला. संबंधित विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्या आईने कोर्टात धाव घेतली. यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं.

संबंधित बातम्या

अफजल नव्हे, रोहित वेमुला आदर्श : कन्हैया कुमार 


रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण: हैदराबाद विश्वविद्यापीठाचे कुलगुरु मोठ्या सुट्टीवर 


रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण दलितविरोधी मुद्दा नाही : स्मृती इराणी




रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, अशोक वाजपेयींकडून डी. लिट परत