पाटणा: बिहारमध्ये आलेल्या महापुराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला आहे. या पुरामुळे बिहारच्या 38 पैकी 13 जिल्ह्यातील जवळपास 70 लाख नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. नेपाळमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बिहारमध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे.



पुराचा सर्वात मोठा तडाखा कटिहार जिल्ह्याला बसला असून, तिथं लष्कराच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय दरभंगा, किशनगंज, अरिरिया, पूर्णिया, मधेपुरासह अनेक जिल्ह्यांना या पुराची झळ पोहोचली आहे.



या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी पूरग्रस्त दरभंगा परिसराची हवाई पाहणी केली.

2 लाख 48 हजार नागरिक सुरक्षित स्थळी

पूरस्थितीमुळे 13 जिल्ह्यातील 2 लाख 48 हजार 140 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. हे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.



 बचावकार्यासाठी एनडीआरएफची 22 पथकं

या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या बिहारच्या मदतीला एनडीआरएफची पथकं धावली आहेत. बिहारमध्ये सध्या 22 पथकं कार्यरत आहेत. यामध्ये 949 जवान, 100 बोटी, याशिवाय एसडीआरएफच्या 15 टीम- यामध्ये 421 जवान, 82 नौका, तसंच सैन्यदलाच्या चार तुकड्या यामध्ये 300 जवान आणि 40 बोटींचा समावेश आहे.



याशिवाय वायूसेनेच्या दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात खाद्यान्न पुरवलं जात आहे.