नवी दिल्ली : काळा पैसा खपवणं आणि नोटाबदलीप्रकरणी दिल्लीतील वकील रोहित टंडनला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने रोहित टंडनला अटक केली.


नोटाबंदीनंतर बँक अधिकाऱ्यांसोबत मिळून 70 कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप रोहित टंडनवर आहे. रोहित टंडनने पांढरा केलेला पैसा हा राजकारणी आणि अधिकाऱ्यांचाही असू शकतो, अशी शंका ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे

रोहित टंडनच्या लॉ फर्मवरुन 13.65 कोटींच्या नव्या नोट जप्त करण्यात आल्या होते. कोलकातामधील उद्योजक पारसमल लोढाने रोहित टंडनला मदत केल्याचा आरोप आहे. लोढाच्या चौकशीनंतरच टंडनला अटक केली आहे.

पारसमलचं शेखर रेड्डी आणि रोहित टंडनशी कनेक्शन

दिल्लीतील वकील रोहित टंडनचं कोलकाताचा उद्योजक पारसमल लोढा आणि चेन्नईचा उद्योजक शेखर रेड्डी यांच्याशी संबंध आहे. सुरुवातीला रोहित टंडनच्या दिल्लीतील कार्यावर छापा पडला, ज्यात सुमारे 13.65 कोटींची रोकड सापडली. यानंतर तपास यंत्रणा चेन्नईचे उद्योजक आणि हवाला ऑपरेटर शेखर रेड्डीपर्यंत पोहोचले. रेड्डीच्या घरातून 170 कोटी रुपयांची रोकड मिळाली. या साखळीत तिसरं नाव कोलकाताचा उद्योजक पारसमल लोढाचं आहे.