नवी दिल्ली : नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान 31 डिसेंबरला रात्री 7.30 वाजता देशाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान काळ्या पैशांविरोधातील लढाई आणि नोटाबंदीसंबंधित काही मोठ्या घोषणा करु शकतात.
दरम्यान देशाला संबोधित करण्याआधी पंतप्रधान सरकारच्या काही मंत्र्यांची बैठकही घेणार आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही करणार आहेत.
याआधी 8 नोव्हेंबर रोजी देशाला संबोधित केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. या नोटा जमा करण्यासाठी त्यांनी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. पण ती आता संपत आहे. त्यामुळेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या भाषणात मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.