अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या घरी चोरी झाली आहे. वाघेला यांच्या घरातून सुमारे 5 लाख रुपयांच्या रोख रकमेसह दागिन्यांचं चोरी झाल्याचं कळतं. वाघेला यांच्या एका निकटवर्तीयाने पोलिसात सुमारे तीन लाखांची रोकड आणि दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात वाघेला यांचा 'चौकीदार' अर्थात सुरक्षारक्षक संशयित आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. चोरीची ही घटना वाघेला यांच्या गांधीनगरमधील निवासस्थानी घडली.


या प्रकरणी वाघेला यांचे निकटवर्ती सूर्यसिंह चावडा यांनी पेथापूर पोलिसात तक्रार दाखल करुन, वाघेला यांच्या घरातून तीन लाख रुपयांची रोकड आणि दोन लाखांचे दागिने चोरी झाल्याचं म्हटलं आहे. चार वर्षांपूर्वी त्यांना या घरात बासुदेव उर्फ शांभू गुरखा नावाच्या व्यक्तीला सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला ठेवलं होतं. तो पत्नी आणि मुलांसह इथे राहत होता. पण ऑक्टोबर महिन्यात मुलांना शाळेत घालायचं आहे, असं सांगून तो पत्नी आणि मुलांसह घरातून निघून गेला. तेव्हापासून तो परतलेला नाही, असंही तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांत गुन्हा, तपास सुरु
तक्रारीनुसार, ज्या खोलीतील कपाटात पैसे आणि दागिने ठेवले होते, त्याचा वापर केवळ बासुदेव करत होता. त्यामुळे चोरीमध्ये त्याचा हात असू शकतो, असा संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका लग्नासाठी कपाटातून दागिने काढण्यासाठी वाघेला कुटुंबातील काही लोक गेले असता, त्यांना चोरी झाल्याचं समजलं. पेथापूरच्या पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, शंकर सिंह वाघेला यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.