चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरके नगर या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण या जागेसाठी तब्बल 82 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.


मतदान केंद्रात केवळ 4 मतदान यंत्र लावता येतात आणि यातील उमेदवारांची मर्यादा 63 असते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी काय करायचं, असा पेच निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.

आरके नगर मतदारसंघात 12 एप्रिल रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होईल. जयललिता यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. शशिकला गट आणि ओ. पन्नीरसेल्वम गटाची इथे प्रमुख लढत असेल.

भाजपने प्रसिद्ध संगीतकार गंगई आमरन यांना रिंगणात उतरवलं आहे. तर डीएमकेने एन.मुर्तूगणेश यांना उमेदवारी दिली आहे. हे मुख्य स्पर्धक असले तरी उमेदवारांची यादी इथेच संपत नाही. निवडणूक आयोगाकडे तब्बल 82 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

मतदान केंद्रात जास्तीत जास्त चार मतदान यंत्र लावता येतात. ईव्हीएमवर 15 बटण असतात आणि यातील एक बटण हे नोटासाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे. यानुसार चार मशिन्सवर उमेदवारांची मर्यादा 63 आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी काय करायचं, असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर आहे.

बॅलेट पेपरद्वारे निवडणूक?

निवडणूक आयोग अशा परिस्थितीत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दुपारनंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल. पण उमेदवारांची संख्या 63 पेक्षा जास्त झाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करु, असं तामिळनाडू राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

मतदान यंत्रांमधील उमेदवारांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रलंबित आहे. नवीन मतदान यंत्रांना तांत्रिक भाषेत एम 3 ईव्हीएम असे म्हटले जाते. या मशिनमध्ये तब्बल 126 उमेदवारांचा समावेश शक्य आहे. या नवीन मशिन्सचा वापर 2019 च्या निवडणुकांसाठी होऊ शकता, असा अंदाज लावला जात आहे.