नवी दिल्ली : बिहारच्या राजकीय वर्तुळात उद्याचा दिवस महत्त्वाचा ठरणार असून, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लालू प्रसाद यादव कुटुंबियांच्या घरांवर सीबीआयच्या छापेमारीमुळे बिहारमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यादव कुटुंबियांच्या संपत्तीवर सीबीआयने टाच आणल्याने, लालू प्रसाद यादव यांनी उद्या आरजेडीच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
विशेष म्हणजे, लालू प्रसाद यादव एकीकडे आरजेडी आमदारांसोबत बैठक घेणार आहेत, तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जनता दरबारनंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या संपत्तीवर सीबीआयच्या छापेमारीवर मौन बाळगलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमारांचं यावर काय मत आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
वास्तविक, नितीश कुमार दर सोमवारी आपल्या घरी जनता दरबाराचं आयोजन करतात. या कार्यक्रमात जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर, नितीश कुमार माध्यमांशी संवाद साधतात. पण यावेळचा जनता दरबाराकडे सर्वांचं लक्ष लागले असून, लालू प्रसाद यादव यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी नितीश कुमार काय भूमिका घेतात, याबद्दल बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांनीही 11 जुलै रोजी आपल्या जनता दल (यू.)ची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सहभागी असणार आहेत.
आतापर्यंत बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या पटणा आणि दिल्लीतील एकूण 12 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे. याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाशी आघाडी असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूने मौन बाळगलं आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत लालू प्रसाद यादव काय निर्णय घेतात, यावरुन बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.