बिजिंग : सिक्किम सीमेवरच्या मुद्यावरुन भारत आणि चीनमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर चीननं भारतात जाणाऱ्या आपल्या नागरिकांना सुरक्षेबाबत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

चीनच्या नागरिकांनी सुरक्षेबाबत सावध राहावं. स्वतःची काळजी घ्यावी, असं चीनच्या भारतातील दूतावासामार्फत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. भारतात जाऊ नये, यासाठीचा हा इशारा नाही. तर चिनी प्रवाशांनी सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, असा सल्ला दिल्याचं चीनच्या परराष्ट्र खात्यानं सांगितलं.

भारतात येणाऱ्या चिनी नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल अॅलर्ट' जारी करण्याचे संकेत चीननं या आठवड्याच्या सुरुवातीलाच दिले होते. भारतातील सुरक्षेबाबतची परिस्थिती पाहता प्रवाशांनी काळजी घ्यावी, असं त्यात म्हटल्याचं चीनच्या परराष्ट्र खात्यानं सांगितलं होतं.  त्यानुसार आज हा अलर्ट चीनच्या दूतावासानं जारी केलाय.

दुसरीकडे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची जर्मनीतील हॅम्बर्ग येथील जी-२० शिखर परिषदेत एकमेकांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं.

दरम्यान, भारतीय सीमेत घुसखोरी आणि त्यानंतर नकाशात सिक्किमचा भाग आपला असल्याचा दावा चीननं केला होता. त्यामुळं या परिसरातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये संबध ताणले गेले आहेत.

संबंधित बातम्या

G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र


… तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी


हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात


ट्रम्प यांना खुश करण्यासाठी भारतीय सैन्यदलाची घुसखोरी, चिनी मीडियाची आगपाखड


भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’