रिओ दि जानेरो : भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीने रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मिर्झा-बोपण्णा जोडीने ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरे आणि हेदर वॉटसनचं आव्हान 6-4, 6-4 असं मोडून काढलं.
शुक्रवारी झालेल्या या लढतीत 6-4, 6-4 अशा फरकाने हा सामना 67 मिनिटांत जिंकला.
सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णाच्या या विजयामुळं टेनिसमध्ये भारताच्या पदकाच्या आशा आता उंचावल्यायत. ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित करण्यासाठी मिर्झा-बोपण्णा जोडीला केवळ एका विजयाची गरज आहे.
मिर्झा-बोपण्णा जोडीचा आणखी एक विजय भारताला रौप्य पदक मिळवून देईल. तसंच विजय न मिळाल्यास भारताला कांस्य पदकासाठी लढावं लागणार आहे.
यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये भारताला टेनिसचं फक्त एकच पदक मिळालं आहे. लिअँडर पेसने 1996 साली अटलांटामधील ऑलिम्पिक दरम्यान कांस्य पदक मिळवून दिलं होतं.
यापूर्वी या जोडीने आपल्या पहिल्या फेरीतील खेळात ऑस्ट्रेलियाच्या समांथा स्टोसुर आणि जोनाथन पीअर्स जोडीवर मात करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. सानिया-बोपण्णा जोडीने हा सामना 7-5, 6-4 ने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. आता अँडी मरे आणि हेदर वॉटसनला नमवून उपांत्य फेरी गाठली आहे.