नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे, याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार राज्यांनी केलेल्या उपाययोजनांचा पाठपुरावा करत आहे. ज्या भागात कोरोनाचा सामना करण्यात राज्यांना अडचणी येत आहेत, तेथे आवश्यक पाठिंबा देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आपल्या सर्वांसाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 34 जिल्हे कोरोनाबाधित झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजर 541 वर गेला आहे., तर 583 लोक मरण पावले आहेत, ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 34 जिल्ह्यापैकी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यामधील स्थिती बिकट आहे. तर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात कोरोना एकही रुग्ण नाही याबद्दल आनंद असल्याचं हर्ष वर्धन यांनी सांगितल.
गोंदिया आणि उस्मानाबादमध्ये गेल्या 28 दिवसांपासून नवीन रुग्ण आढळले नाहीत. गेल्या 21 दिवसांत बीडमध्ये कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाहीत. गेल्या सात दिवसांपासून अहमदनगर व भंडारा येथे कोणतेही नवीन कोरोनाबाधीत रुग्णा आढळले नाहीत. सर्व जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये रुपांतरित करण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य होईल, असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं.