मुंबई : देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी तब्बल 1/3 (एक तृतीयांश) एटीएम नादुरुस्त असल्याचा अहवाल रिझर्व बँकेने जाहीर केलाय. रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल चार हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष जारी केलाय.


 
सध्या बरेचसे बँक ग्राहक बँकिंग व्यवहारासाठी थेट बँकेच्या शाखेत जाण्याऐवजी एटीएमलाच पसंती देतात. त्यामुळे बँकांवरील कामाचा ताणही कमी झालाय, शिवाय ग्राहकांचीही सोय झालीय. तरीही मोठ्या प्रमाणात बँक एटीएम खराब असणं व्यापक विकासाला घातक असल्याचं मत रिझर्व बँकेने नोंदवलंय.

 

ज्या ज्या बँकाची एटीएम खराब किंवा नादुरूस्त आहेत, त्यांनी ती तातडीने दुरूस्त करावीत असं आवाहनही रिझर्व बँकेने केलंय. एटीएमच्या दुरूस्तीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा इशाराही रिझर्व बँकेचे उपगव्हर्नर एसएस मुंद्रा यांनी दिलाय.

 
देशभरातील बऱ्याचशा बँकाच्या एटीएममध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा नसल्याचा निष्कर्ष रिझर्व बँकेच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे.