कोलकाता: राजकारणात कुणीही कुणाचा फार काळ मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात. कारण राजकारणात निष्ठा आणि इमानदारीचे निकष पावलापावलांवर बदलतात. सत्तेच्या लाभासाठी राजकीय नेते वारंवार निष्ठा बदलतात. हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट असलेलं सत्य. कपडे बदलावे तसे राजकारणात पक्ष किंवा गट बदलले जातात.
नेमका यावर रामबाण उपाय म्हणून पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेल्या आमदारांकडून काँग्रेसने शपथपत्र लिहून घेतलं आहे. अर्थात हे शपथपत्र साध्या कागदावर नसून त्यासाठी चक्क 100 रूपयांचा स्टँप पेपर वापरण्यात आला आहे.
म्हणजेच राजकारणात निष्ठा किंवा इमानदारी ही स्टँप पेपरवरही लिहून देण्याचा नवा पायंडा काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये सुरू केला आहे.
काँग्रेस अध्यक्षांच्या नावाने लिहून देण्यात आलेल्या या शपथपत्रात काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आमदाराने भविष्यात कधीही पक्षाबरोबर गद्दारी किंवा बंडखोरी करणार नसल्याचं लिहून दिलं आहे.
राजकारणी तसे आश्वासन देण्यात अग्रेसर असतात. किंबहुना प्रत्येकवेळी आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचं कसब राजकारणातली पहिली पात्रताच बनली आहे जणू. त्यावर नामी उपाय म्हणून आता स्टँप पेपरचा उतारा काढण्यात आला आहे.
काँग्रेसचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी निवडून आलेल्या प्रत्येक आमदारांकडून निष्ठेचं शपथपत्र 100 रूपयांच्या बाँडवर लिहून घेतलं आहे. ही बाब सार्वजनिक झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने आपली नाराजी व्यक्त केली आहे. निष्ठा ही काही स्टँप पेपरवर लिहून देण्याची बाब नाही. असंही पक्षाच्या हायकमांडने अधीर चौधरी यांना सुनावलं आहे. त्यावर अधीर चौधरी यांनी आपण हे शपथपत्र देण्यासाठी एकाही आमदारावर दबाब टाकला नाही. प्रत्येक आमदाराने स्वेच्छेने हे प्रतिज्ञापत्र 100 रूपयांच्या स्टँप पेपरवर लिहून दिल्याचा दावाही केला आहे.
पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसने निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराकडून लिहून घेतलेलं शपथपत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना संबोधित करण्यात आलं आहे. तसंच या पत्रात निष्ठेची शपथ घेत कधीही पक्षविरोधी कारवाया करणार नसल्याची शपथही घेतली आहे. कोणत्याही पक्षविरोधी कारवायात आपला सहभाग आढळल्यास आपण पक्षाचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचंही या निवडून आलेल्या आमदारांनी स्टँपपेपरवर लिहून दिलं आहे.