दिल्लीच्या VVIP सुरक्षा असलेल्या विजय चौकात नीलगायीचा संचार
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2016 04:44 AM (IST)

नवी दिल्ली : मानवी वस्तीत जंगली प्राणी शिरल्याचं आपण ऐकतो, मात्र चक्क दिल्लीतल्या संसद परिसरासारख्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये नीलगाय आढळल्याने खळबळ उडाली आहे. संसदेसमोरच्या विजय चौक परिसरात एक नीलगाय आरामात फिरत असल्याचं दिसून आलं आणि सगळ्यांची चांगलीच पाचावर धारण बसली. नीलगाय पाहिलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. मंत्री, खासदार, व्हीआयपींचा राबता असलेल्या संसदेच्या परिसरात नीलगाय शिरल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पशुपालन विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र तब्बल दोन तासांनंतरही पशुपालन विभागाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या जागेची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.