पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नका
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2019 12:09 AM (IST)
पाकिस्तानी सैन्याकडून पाच व्हिडिओ चित्रित करण्यात आले असून 'सायकॉलॉजिकल ऑपरेशन' अर्थात मानसिक दबाव आणण्यासाठी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर वायरल केले जात आहेत, असं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं.
श्रीनगर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे व्हिडिओ इंटरनेटवर वितरित करुन पाकिस्तान हा भारताविरुद्ध मानसिक खेळी करण्याचा प्रयत्न करत आहे, असं सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणं नेटिझन्सनी थांबवावं, असं आवाहन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून पाच व्हिडिओ चित्रित करण्यात आले असून 'सायकॉलॉजिकल ऑपरेशन' अर्थात मानसिक दबाव आणण्यासाठी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर वायरल केले जात आहेत, असं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं. सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांचं मनोधैर्य कमी करण्याचं पाकिस्तानचं उद्दिष्ट असल्याचं सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केलं. विंग कमांडरला पाकिस्तानने बंदीवान केल्यानंतरचे व्हिडिओ भारतात अनेक नेटिझन्सनी शेअर केले असून पाकिस्तानविरोधात आग ओकली आहे. विंग कमांडर यांचे कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करु नका, असं आवाहन भारतीय सैन्याने केलं आहे. पाकिस्तानी सैन्य आणि मीडियाकडून हे फोटो पसरवले जात असल्याची माहिती आहे. मिग 21 बायसन विमानातून एका विंग कमांडरला सुरक्षितपणे स्वतःला बाहेर काढलं, मात्र ते एलओसीजवळ लँड झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं. पाकिस्तानच्या ताब्यात फक्त एकच पायलट असून विंग कमांडरला लष्कराच्या नैतिकतेनुसार वागवलं जात असल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे.