नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade 2023) पाहायला आलेल्या एका स्पेशल गेस्टने अशी काही इच्छा व्यक्त केली की ज्यामुळे तुम्ही आम्ही अवाक् होऊन जावू. महत्त्वाचं म्हणजे हा स्पेशल गेस्ट कोणत्या राष्ट्राचा वा राज्याचा प्रमुख नव्हता तर मध्य प्रदेशातील एक बागकाम करणारा कर्मचारी होता. ठेकेदाराकडून आपला 44 दिवसांचा थकलेला पगार मिळावा अशी त्याची इच्छा असून पंतप्रधान मोदींशी जर बोलण्याची संधी मिळाली असती तर ही इच्छा त्याने व्यक्त केली असती.
या वर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड पाहायला खास सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आणि कर्तव्य पथाच्या कामगारांना स्पेशल पास दिले गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आलेल्या सर्व कामगारांना अभिवादन केलं. यावेळी देशाच्या पंतप्रधानांना जवळून पाहता आलं, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला म्हणून या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसून आलं.
बागकाम करणाऱ्या कर्मचाऱ्याची इच्छा
स्पेशल गेस्ट म्हणून आलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशमधील बागकाम करणारे कर्मचारी सुखनंदन हेदेखील होते. बागकाम कर्मचारी सुखनंदन यांना पंतप्रधान मोदींना भेटून कसं वाटलं आणि संधी मिळाल्यास त्यांनी काय संवाद साधला असता असा प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान मोदींना जवळून भेटून फार छान वाटलं, तसेच या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं आणि प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इतक्या जवळून अनुभवता आला याचं समाधना वाटत असल्याचं सुखनंदन यांनी सांगितलं.
सुखनंदन म्हणाले की, "मी आयुष्यात कधी विचार नव्हता केला की मला कधी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहूणा म्हणून निमंत्रित केलं जाईल. मी याची कधी कल्पनादेखील केली नव्हती की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जवळून पाहू शकेल. मला जर पंतप्रधान मोदींशी संवाद साधायला मिळाला असता तर मी जुन्या ठेकेदाराने थकवलेला 44 दिवसांचा माझा पगार मिळावा अशी मागणी केली असती."
सुखनंदन हे दिल्लीमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट या ठिकाणी बागकाम करणारे कर्मचारी असून ते मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुखनंदन इंडिया गेटवरील हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे. याआधी ते आंध्रभवन येथील एका ठेकेदाराकडे काम करत होते.
ही बातमी वाचा: