Bhiwandi : भिवंडीमध्ये लहान मुलाच्या तस्करीचं प्रकरण समोर आले आहे. दीड  वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करुन विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्या चिमुरड्याची सुखरुप सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 
 
भिवंडी शहरात कामतघर परिसरातून 26 डिसेंबर रोजी अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना महिन्यानंतर यश आले आहे. या चिमुरड्याला अपहरकर्त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केल्यानंतर चिमुरडा आई वडिलांच्या कुशीत विसवल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकरणी अपहरण करून  चिमुरड्याची विक्री  करणाऱ्या एक व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.  गणेश नरसय्या मेमुल्ला (वय, 38) भारती सुशील शाहु (वय ,41) आणि आशा संतोष शाहू (वय, 42) असे अटक आरोपींचे नावे आहे.  आरोपीमध्ये या दोन बहिणीचा समावेश असल्याचे समोर आले. तर सिद्धांत असे सुखरूप सुटका झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 


घराबाहेर खेळत असताना अपहरण ..


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतील  हनुमान नगर, कामतघर भागात चिमुरडा आई-वडिलांसह राहतो. घटनेच्या दिवशी त्याची आई सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धुवत असताना त्यांचा दीड वर्षीय वर्षीय सिद्धांत  घराबाहेर खेळत असताना नोट दाखवून  त्याचे अपहरण झाले होते. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर  घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुरेश गूगे  असे पथक तयार करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास करताना जंगजंग पझाडले होते.


चिमुरड्यास एक लाखात विक्री -


शिवाय पोलीस पथकाने नेपाळ सीमेपर्यंत आपला तपास करीत शोध मोहीम सुरु केली. सीसीटीव्ही व एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करीत संशयित आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला याला  कामतघर परिसरातून  ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मूल चोरी करून 1 लाख 5 हजार रुपयांना विक्री केल्याचे कबुल केले.  त्यानंतर पोलीस पथकाने भिवंडीतील पद्मानगर नवजीवन कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या आरोपी भारती सुशील शाहु  व आशा संतोष शाहू या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चिमुरड्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्यास आईवडिलांच्या हाती सुखरूप स्वाधीन केलं. त्याशिवाय तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.  


मूल नसल्याने वर्षभरापूर्वी कट रचून चिमुरड्याचे अपहरण 


आरोपी भारती सुशील शाहू व आशा संतोष शाहू या दोघी बहिणी आहेत. आरोपी आशा हिला मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला. तो तिने बहीण भारतीला बोलून दाखवला. त्यानंतर भारतीची ओळख आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला यासोबत होती. त्यांनी वर्षभरापूर्वी हा कट रचून चिमुरड्याचे अपहरण  करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोपी गणेश मेमुल्ला याने हनुमान नगर परिसरात टेहळणी करून लहान मूल हेरले. त्यामध्ये सिद्धांत हा त्याच्या नजरेत आला व त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.


अपहरण झाल्याच्या धक्क्याने आई आजारी  .... 


26 डिसेंबर रोजी सिद्धांत हरवल्यापासून त्याचे पानपट्टी चालवणारे त्याचे वडील रामगोपाल आणि आई सुंदरी मुलाच्या शोधात वेडेपिसे झाले होते. विशेष म्हणजे पोलीस तपास करीत असताना आई वडीलसुध्दा शोध घेत वणवण फिरत होते. स्वतः जवळ गाडी नसताना शेजाऱ्यांकडून गाडी घेऊन व्यवसाय बंद करून मुंबई, ठाणे कल्याण, भिवंडी या परिसरात शोधून त्रस्त झाले होते. चिमुरड्याची आई तर अपहरण झाल्याच्या  धक्क्याने  आजारी  पडल्याने आठ दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. 


आईवडिलांच्या अश्रूंचा फुटला बांध.. . 


26 जानेवारी रोजी दोघे आईवडील भिवंडी शहरात शांतीनगर गैबी नगर परिसरात चिमुरड्याला शोधून रात्री साडेदहा वाजता घरी परतले. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी मोबाईलवर फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांच्यासमोर चिमुरड्यास हजर केल्यानंतर आईवडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. ते आनंदाश्रू पोलिसांच्या शोधामुळे शक्य झाले असे सांगत सुंदरी गौतम यांनी पोलिसांच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर पोलीस उपायुक्तांनी नवनाथ ढवळे यांनी आपल्या लहान बालकांची सुरक्षितता सुनिश्चित करूनच इतर काम करावे असे आवाहन भिवंडीकरांना केले आहेत.