नवी दिल्ली : 71 व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा दिल्लीतल्या राजपथावर पार पडला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या खास सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्रपती जायर मेसियास बोल्सिनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पथसंचलनातून लष्करी सामर्थ्याचं जगाला दर्शन घडवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


त्याआधी पंतप्रधान मोदी य़ांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह, हवाई दल प्रमुख एअर मार्शल आर. के. एस. भदोरिया यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राजपथावर संरक्षण दलांच्या पथकांचं परेड पार पडली. या परेडमधून तिन्ही दलांच्या सामर्थ्यांचं दर्शन झालं. हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला. याशिवाय प्रत्येक राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथही पाहावयास मिळालं. यंदाच्या पथसंचलनात दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा या चित्ररथाला स्थान मिळालं नव्हतं. रोटेशन पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. वेळेच्या अभावामुळे निवडक चित्ररथांनाच परवानगी दिली जाते. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने आज राज्याच्या पथसंचलनात कान्होजी आंग्रे चित्र रथाला स्थान दिलं.



मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी एनसीसी आणि एमसीसीच्या विद्यार्थ्यांसह पोलिस खात्याकडूनही पथसंचलन करण्यात आलं.

यावेळी कान्होजी आंग्रेंची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी झाला. महाराष्ट्राचा "कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल" या विषयावरील चित्ररथ राजपथाच्या संचलनात सहभागी झालेला नाही. त्यामुळे या चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची शोभा वाढवली.