जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण संविधान लागू होण्यासाठी तीन वर्ष लागली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आलं, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 26 जानेवारीला या घटनेचं भव्य सेलिब्रेशन केलं जातं, ज्यात सैन्याचे जवान परेड करतात आणि देशातील विविध रथांच्या माध्यमातून राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडतं.
राष्ट्रीय समर स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली
सकाळी साडे नऊ वाजता पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राष्ट्रीय समर स्मारक (नेशनल वॉर मेमोरियल) येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर पंतप्रधान 9.45 वाजता राजपथावर जाऊन राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथींचं स्वागत करतील. ठीक 10 वाजता प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात होईल. यंदा पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान राष्ट्रीय समर स्मारकला जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहतील. याआधी अमर ज्योतच शहिदांचं समाधी स्थळ मानलं जायचं. पण 25 फेब्रुवारीला पंतप्रधानांनी राष्ट्रीय समर स्मारक देशाला समर्पित केलं होतं. त्यामुळेच आता राष्ट्रीय समर स्मारकचं शहिदांचं समाधी स्थळ झालं आहे.
Republic Day Special | प्रजासत्ताकदिनाच्या रंजक गोष्टी! | WEB Exclusive | ABP Majha
प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?
भारताच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय संविधान अंगीकारलं होतं. तर 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी भारताचं संविधान संपूर्ण देशात लागू झालं होतं. या निमित्ताने दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या देशाचं संविधान लिहिण्यात आलं. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्षा 11 महिने आणि 18 दिवसांचा वेळ लागला होता. हे लिहिण्यासाठी संविधान सभेच्या 308 सदस्यांनी अथक परिश्रम केले होते. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागचं कारण म्हणजे 26 जानेवारी 1929 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीविरोधात काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याचा नारा दिला होता.
प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कुठे झाली होती?
संविधान लागू झाल्यानंतर 1950 पासून 1954 पर्यंत, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी केलं जात होतं. प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड आर्विन स्टेडियम म्हणजेच सध्याच्या नॅशनल स्टेडियमवर झाली होती. त्यानंतर लाल किल्ला, रामलीला मैदान आणि किंग्जवे कॅम्पवर परेड झाली होती. मात्र 1955 मध्ये पहिल्यांदा राजपथावर परेडचं आयोजन करण्यात आलं.
या दिवशी ध्वजारोहण कोण करतं?
स्वातंत्र्यदिनाला देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ता दिनाला हा मान राष्ट्रपतीपतींचा असतो. अशाचप्रकारे राज्यांमध्येही मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपाल ध्वजारोहण करतात. या निमित्ताने 21 तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रगीत सुरु होताच पहिली सलामी आणि त्यानंतर 52 सेकंदांनंतर अखेरची सलामी दिली जाते.
बीटिंग रिट्रीटने प्रजासत्ताक दिनाची सांगता
राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, परेड आणि इतर कार्यक्रम झाल्यानंतर प्रजासत्ताक दिन समाप्त होणार असा तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. कारण प्रजासत्ताक दिनाचा उत्सव हा एक दिवसाचा नाही. तर 29 जानेवारीला 'बीटिंग रिट्रीट' सोहळ्याने या उत्सवाची सांगता होते. 29 जानेवारीला विजय चौकात भारतीय सैन्य, , हवाई दल आणि नौदल यांच्यातर्फे परेड आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दुसऱ्या देशाच्या प्रधानमंत्रीना आमंत्रण दिले जाते. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना बोलविण्यात आले होते.
संबंधीत बातम्या