Republic Day Parade Timing : 26 जानेवारी 2022 रोजी आपला 75 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे. देशात दरवर्षी या दिवशी राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे (Republic Day Parade) आयोजन केले जाते. परंतु, यावेळी परेड ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. गेल्या 75 वर्षात उशिराने परेड सुरु होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचं कारण असं की, कोरोनाचे नियम आणि श्रद्धांजली सभेमुळे प्रजासत्ताक दिनाची परेड यावर्षी उशिराने सुरु होणार आहे. सर्वात आधी जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. यानंतरच परेडला सुरुवात होणार आहे. 


संपूर्ण परेड 90 मिनिटांची असते. दरवर्षी 26 जानेवारीला सकाळी ठिक 10 वाजता राजपथावर परेड सुरु होते. परंतु, यावेळी ही परेड 10:30 वाजता सुरू होणार आहे. साधारण 8 किलोमीटर अंतराची ही परेड असणार आहे.  रायसीना हिलवरून सुरु झालेली परेड राजपथ, इंडिया गेटच्या दिशेने फिरून लाल किल्ल्यावर संपते. परेडच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडिया गेटवर शहीद जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत.


300 सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर :


देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी राजपथ आणि आसपासच्या परिसरावर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. जवळपास 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच चेहऱ्याची ओळख पटवणारी यंत्रणाही बसविण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये 50 हजार संशयित गुन्हेगारांचा डाटाबेस आहे. कोविड-19 संबंधित निर्बंधांमुळे केवळ 4 हजार तिकिटे उपलब्ध होणार आहेत. या सोहळ्याला 24 हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे.


प्रजासत्ताक दिनाचा फ्लायपास्ट 75 विमानांसह 'भव्य' असेल


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून यावर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिवस एकूण 75 विमानांसह आकाशात भरारी घेणार आहे. 75 वर्षाच्या निमित्ताने आतापर्यंतचा हा सर्वात मोठा असा फ्लायपास्ट होणार आहे. हवाई दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी असे सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीचे फ्लायपास्ट भव्य असणार आहे. यामध्ये हवाई दलासह नौदलाची जहाजेसुद्धा सहभाग घेणार आहेत. तसेच, राजपथावर 5 राफेलसुद्धा उड्डाण करणार आहेत. पुढे ते असंही म्हणाले की, यावेळी 17 जेगुआर फायटर विमानं '75' च्या शेपमध्ये आकाशात भरारी घेणार आहेत. त्याचबरोबर, MiG29Kआणि P-81 सर्विलान्स ही लढाऊ विमानेसुद्धा आकाशात उड्डाणासाठी तयार आहेत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha