नवी दिल्ली : देशाच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा आज राजपथावर पाहायला मिळाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. राजपथावरील सोहळ्यासाठी  दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी हजेरी लावली होती.


प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या तिन्ही दलांनी आपलं शक्तिप्रदर्शन दाखवलं. तर, विविधतेने नटलेल्या देशाचं सांस्कृतिक सामर्थ्यही अनेक राज्यांच्या, विविध खात्यांच्या चित्ररथातून पाहायला मिळालं.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता झाली. सुमारे 90 मिनिटांचा हा शानदार सोहळा होता. या सोहळ्यात 22 राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.

प्रजासत्ताक दिन का साजरा करतात?

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि त्याची लोकशाही राज्य घटना 26 जानेवारी 1950 ला अमलात आली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.