Remal Cyclone Hit On Sunday Odisha West Bengal: नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) 'रेमल' या चक्रीवादळाची (Remal Cyclone) निर्मिती झाली आहे. रविवारी हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 इतका राहू शकतो. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये (Odisha) एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर, अतिरिक्त पाच तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम मान्सूनवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्यांचं चक्री वादळात रूपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला 'रेमल' असं नाव देण्यात आलं आहे. शनिवारी संध्याकाळी भारतीय हवामान संस्थेनं सांगितलं की, हे चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर धडणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. रेमल हे मान्सून आल्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पहिलं चक्रीवादळ आहे. 


रेमल चक्रीवादळ कुठे धडकणार? 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या 'रेमाल' चक्रीवादळचं केंद्र खेपुपारापासून सुमारे 360 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि सागर बेटाच्या 350 किमी दक्षिण-पूर्वेस आहे. आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळाची तीव्रता आणखी तीव्र होऊन रविवारी सकाळपर्यंत त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. 


IMD च्या मते, रविवारी मध्यरात्री सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीला 110 ते 120 किमी प्रतितास वेगानं वाऱ्याचा वेग ओलांडण्याची अपेक्षा आहे. 26-27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओदिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 27-28 मे रोजी ईशान्य भारतातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे.  


IMD ने मच्छिमारांना 27 मे च्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. दक्षिण आणि उत्तर 24 परगणा सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 26-27 मेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, या भागात काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.


काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा


रविवारी हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असून पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये  26 आणि 27 मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार? 


उष्णकटिबंधीय भागातून तयार होणाऱ्या वादळाच्या प्रकारात मोडत असलेलं हे चक्रीवादळ सर्वात आधी ओमानमध्ये 2024 च्या मान्सून हंगामापूर्वीच दाखल होणार आहे. ओमान देशाच्या हवामानखात्यानं या चक्रीवादळाला 'रेमल' असं नाव दिलं आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ 'वाळू' असा होतो. या चक्रीवादळमुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये (Cyclone Remal) मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर मात्र, या चक्रीवादळाचा काहीच परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.