नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. कोरोना व्यवस्थापनात सैन्याकडून सुरु असलेल्या मदतीच्या विविध उपक्रमांवर दोघांनी चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल प्रमुख आणि सीडीएस बिपिन रावत यांच्यासमवेत बैठक घेतली.


मनोज मुकुंद नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवले की, सैन्य आपली रुग्णालये सर्वसामान्यांसाठी खुली करत आहे. जिथे शक्य असेल तेथे सामान्य नागरिक लष्करी रुग्णालयात जाऊ शकतात. कोविडच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये बांधत आहे. लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना अशी माहिती दिली की, जेथे आयात केलेले ऑक्सिजन टँकर व वाहने व्यवस्थापनात तज्ज्ञांचे कौशल्य आवश्यक आहे, तेथे सैन्याकडून मदत पुरवली जात आहे.


लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या  मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. लष्कर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू करत असल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.