मुंबई : रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) कंपनीकडून 2017-18 या आर्थिक वर्षात एक रुपयाही पगार घेणार नाहीत. तर कंपनीच्या व्यवस्थापनानेही 21 दिवसांचा वैयक्तिक पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.


अनिल अंबानी यांनी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतल्याची माहिती आरकॉमने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

आरकॉम कंपनीवर मोठं कर्ज आहे आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी केवळ सात महिन्यांचा कालावधी उरला आहे. कंपनीला 45 हजार कोटी रुपयांची परतफेड यावर्षी डिसेंबरपर्यंत करायची आहे.

कंपनीने डिसेंबरपर्यंत 60 टक्के कर्ज कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यानंतर कंपनीवर 20 हजार कोटींचं कर्ज राहिल.

अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनीवर मार्च 2017 पर्यंत 45 हजार 733 कोटी रुपयांचं कर्ज आहे. या कर्जाचं ओझं 25 हजार कोटी रुपयांनी कमी करण्यासाठी अनिल अंबानी मोबाईल टॉवर व्यवसाय एका कंपनीला विकणार असल्याचं बोललं जात आहे. यातच आरकॉम कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातमी : मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ अनिल अंबानींसाठी डोकेदुखी!