नवी दिल्ली : तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण चोरट्यांनी आता ग्राहकांना लुटण्याचा नवीन पर्याय शोधला आहे. उत्तर प्रदेशातील मथुरेत काही चोरट्यांनी OLX या वेबसाईटवर जुनी गाडी विक्रीला असल्याची जाहिरीत दिली आणि त्याद्वारे मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात खेचलं.


OLX या वेबसाईटवर डिझायर गाडी विक्रीला असल्याची जाहिरात चोरट्यांनी पोस्ट केली. ही जाहिरात पाहून मध्य प्रदेशातील व्यापारी रवी शर्मा त्यांच्या दोन मित्रांसोबत गाडी खरेदी करण्यासाठी मथुरेला गेले. तिथे गेल्यानंतर चोरट्याने त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि रवी शर्मा यांच्याकडील 3 लाख रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच चोरट्यांचा शोध घेणं सुरु केलं. मात्र एका ठिकाणी पोलीस आणि चोरट्यांमध्ये चकमक झाली. दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं, तर दोघे जण पोलिसांच्या हातातून निसटले.

या चोरट्यांकडून 1 चोरीची दुचाकी आणि 1 लाख 35 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.