नवी दिल्ली : बलात्कार पीडित मुलीने कोर्टात रेखाटलेल्या चित्रामुळे आरोपीला दोन वर्षांनी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात मुलीचं चित्र महत्त्वाचा पुरावा ठरला.


दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत आरोपीविरोधात सबळ पुरावे नव्हते. परंतु न्यायाधीशांनी हे चित्र पुरावा मानला आणि आरोपीला 5 वर्षांची शिक्षा सुनावली.

मूळची कोलकाताची असलेली ही मुलगी आता दहा वर्षांची आहे. तिच्या वडिलांना दारुचं व्यसन होतं तर आईचा मृत्यू झाला होता. वडील तिची काळजी घेत नसत. त्यामुळे तिची काकी तिला दिल्लीला घेऊन आली. त्यावेळी ती आठ वर्षांची होती.

काकीच्या घरी राहत असताना काका अख्तर अहमदने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. अख्तरला मागील वर्षी 4 जून रोजी अटक करण्यात आली होती. परंतु मुलीला 'सक्षम साक्षीदार' मानू शकत नाही, असा दावा त्याच्या वकिलाने केला होता.


पण मुलीने बनवलेल्या चित्रामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात मुलीने कागदावर काळ्या रंगाच्या खडूने एक रिकामं घरं रेखाटलं, ज्यात एक मुलगी हातात फुगा घेऊन आहे. तिच्याजवळच जमिनीवर कपडे पडलेले दिसत आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी हे चित्रच तिची साक्ष मानली. निकाल देताना ते म्हणाले की, "जर हे चित्र तथ्य आणि पार्श्वभूमी मानली, तर असं समजतं की, तिचे कपडे काढून लैंगिक शोषण झालं आहे. या घटनेचा परिणाम तिच्या मनावर झाला आहे, जो पुरावा म्हणून सादर झाला."

"हे चित्र त्या घटनेच्या व्याख्येसाठी पुरेसं आहे. मी पीडितेला सक्षम साक्षीदार समजतो," असं न्यायाधीश म्हणाले.

दरम्यान, कोर्टाने दोषी अख्तर अहमदला पाच वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून तीन लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरुपात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.