नवी दिल्ली : सोशल मीडियावरुन द्वेष पसरवू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वाराणसीमधील भाजप कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी 'नमो अॅप'च्या माध्यमातून संवाद साधताना मोदींनी हे आवाहन केलं.


एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन कुटुंबांतील भांडण ही आजकाल राष्ट्रीय बातमी होते. त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. देशाबाबतच्या सकारात्मक बातम्यांचं वातावरण निर्माण करुया. समाजाला बळकटी देणारी माहितीच शेअर करुया, असंही मोदी यावेळी म्हणाले.

'लोक काहीतरी चुकीचं पाहतात किंवा ऐकतात आणि फॉरवर्ड करतात. पण त्यामुळे समाजाचं किती नुकसान होत आहे, याचा कोणी विचार करत नाही. सभ्य समाजाला अशोभनीय असणारे शब्द काही जण वापरतात. महिलांविषयी वाईट-साईट लिहिलं किंवा बोललं जातं' असंही मोदींनी पुढे म्हटलं.

सोशल मीडियावरुन गलिच्छ गोष्टी पसरवण्यापासून प्रत्येकाने स्वतःला थांबवायला हवं. स्वच्छता अभियान हे फक्त साफसफाईबाबत नसून मानसिक स्वच्छतेबाबतही असल्याचं मोदींनी सांगितलं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगा, असंही मोदी म्हणाले.