लखनऊ (उत्तर प्रदेश) : देशात नोकऱ्यांची किती वाणवा आहे, हे वास्तव सांगणारं चित्र उत्तर प्रदेशात समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील पोलिस विभागात शिपाई पदाच्या 62 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी पाचवी पासची अट ठेवण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या पदासाठी पीएचडीधारकांनी अर्ज केला आहे. आणि तेही एक किंवा दोन जणांनी नव्हे, तर तब्बल 3,700 पीएचडीधारकांनी शिपाई पदासाठी अर्ज केला आहे.


केवळ 62 पदांसाठी भरती केली जात आहे. मात्र या पदासाठी अर्ज करण्यात तब्बल 50 हजार पदवीधर, 28 हजार पदव्युत्तर आणि 3,700 पीएचडीधारकांचा समावेश आहे. पदव्युत्तर अर्जदारांमध्ये बी टेक, एमबीए शिक्षितांचाही समावेश आहे.

एकूण 93 हजार जणांनी 62 पदांसाठी अर्ज केले असून, यातील 7,400 अर्जदार पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहेत.

पोलिस विभागातील शिपाई पदाच्या 62 जागांसाठी भरती केली जात आहे. पोस्टमनसारखी ही नोकरी असेल. पोलिसांच्या टेलिकॉम डिपार्टमेंटमधून पत्र किंवा कागदपत्र घेऊन, दुसऱ्या ऑफिसमध्ये पोहोचवण्याचे काम या पदावरील शिपायाला करावे लागणार आहे.

शिपायाची ही नोकरी पूर्णवेळ सरकारी नोकरी आहे, तसेच 20 हजार रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. कदाचित, त्यामुळेच उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनी या पदासाठी अर्ज केल्याच अंदाज वर्तवला जातो आहे. या सर्व प्रकारामुळे नोकऱ्यांची किती मोठ्या प्रमाणात वाणवा आहे, हे वास्तव समोर आले आहे.