नवी दिल्ली : बँक आणि एटीएममधून पैशांचं वितरण सुरळीत व्हायला किमान दोन ते तीन आठवडे लागतील. त्यामुळे लोकांनी थोडा संयम पाळावा आणि गरज असेल तरच बँकांमध्ये रांगा लावाव्यात, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.


काळ्या पैशाला वेसण घालण्यासाठी मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यामुळे 14 लाख कोटींचं चलन बाद झालं. त्याबदल्यात दोन हजार आणि शंभरच्या पुरेशा नोटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचं वितरण गावखेड्यातील बँका आणि एटीएममध्ये व्हायला थोडा वेळ लागेल, असेही अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं.

एकट्या एसबीआय बँकेत दोन दिवसात 2 कोटी 28 लाख व्यवहार झाले आहेत. ज्यातून जवळपास 47 हजार 868 कोटी रुपये जमा झाल्याचं जेटली यांनी सांगितले.