Jammu & Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर गोळीबार करणारे दहशतवादी हे विदेशी असल्याचं स्पष्ट झालं असून अबू हमजा आणि अधुन अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचं छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केलं आहे. याआधी झालेल्या राजौरी आणि पुंछमधील दहशतवादी हल्ल्यांमागेही या दोन दहशतवाद्यांचा हात असल्याचं सांगितलं जातंय. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. ही बस शिव खोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात असताना पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि ही बस खोल दरीत कोसळली.
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय लेफ्टनंट गव्हर्नर यांनी जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ ते दहा जणांचा ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुकू आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कर, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) या सुरक्षा दलांनी राजौरी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेरियाथ-पोनी-शिव खोडी परिसराला वेढा घातला आहे. याशिवाय ड्रोन आणि स्निफर डॉगसह टेहळणी उपकरणांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी राजौरी आणि रियासीच्या वरच्या भागात लपून बसले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे.