N Biren Singh Convoy Attacked : आधीच वांशिक गृहकलहामुळे अशांत असलेल्या मणिपूरमध्ये आणखी एक मोठी घटना घडली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांच्या सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कांगपोकपी जिल्ह्यात हा हल्ला झाला असून त्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा सुरक्षा ताफा मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात जात होता. मात्र त्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर अचानक अनेक राऊंड फायर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी तत्काळ प्रत्युत्तराची कारवाई केली. हा गोळीबार बराच उशीर सुरू असल्याची माहिती आहे. 


मुख्यमंत्र्यांवरील हा हल्ला म्हणजे मणिपूरच्या लोकांवरील हा थेट हल्ला असल्याचं समजलं जाईल. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल असं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं. 


 




पीटीआयशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्री बिरेन सिंग अद्याप दिल्लीहून मणिपूरमधील इम्फाळला पोहोचलेले नाहीत. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते जिरीबाम येथे जाण्याचा विचार करत होते. अतिरेक्यांनी जिरीबाममधील दोन पोलिस चौक्या, वन विभागाचे कार्यालय आणि 50 हून अधिक घरांना आग लावली होती अशीही माहिती समोर येत आहे.


जिरीबाममध्ये तणाव कायम


पोलिसांनी सांगितले की, मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. शनिवारी (8 जून 2024) घडलेल्या घटनेनंतर, प्रभावित भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लामताई खुनौ, दिबोंग खुनौ, ननखल आणि बेगरा गावात 70 हून अधिक घरांना आग लागली.


मणिपूरच्या जिरीबाममध्ये संशयित अतिरेक्यांनी 59 वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोइबाम सरतकुमार सिंग नावाचा एक व्यक्ती 6 जून रोजी त्याच्या शेतात गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. नंतर त्याचा मृतदेह सापडला, ज्यावर धारदार वस्तूने हल्ला केल्याच्या जखमा दिसून आल्या.


गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत.


ही बातमी वाचा: