नवी दिल्ली: उरीमधील हल्ल्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात पाकिस्तानविरोधात तीव्र असंतोष खदखदतो आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी भावना जनसामान्यातून व्यक्त होत आहे.
भारतीयांच्या या संतापाला सोशल मीडियातून वाट मोकळी करुन देत असतानाच काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ट्रेनमधून सैन्याचे टँक रेल्वेवर लोड करुन घेऊन जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या फोटोंसोबत एक मेसेजही व्हायरल होत असून, या मेसेजमध्ये, ''युद्धाची तयारी सुरु असून आज कोटा रेल्वे स्थानकातून सैन्य दलाचे टँक घेऊन जाताना पाहण्यात आले. या टँकची संख्या पाहता युद्धाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, मित्रांनो मोदींवर थोडासा विश्वास ठेवा!,'' असे म्हटले आहे.
या व्हायरल फोटोंमुळे जो दावा करण्यात येत आहे, त्यात कितपत तथ्य आहे. तसेच हे फोटो नक्की कोटा रेल्वे स्थानकावरीलच आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एबीपी न्यूज टीमने याची पडताळणी करण्यासाठी राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकाचे एडीआरएम पीके बी मेश्राम यांच्याशी संपर्क साधला.
पीके बी मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सैन्य दलाचे असे कोणतेही टँक किंवा इतर कोणत्याही वस्तू घेऊन जाणार असल्यास याची माहिती आधीच दिली जाते. पण गेल्या आठवड्याभरापासून अशी कोणतीही ट्रेन रेल्वे स्थानकातून गेलेली नाही.
या पडताळणीवेळी हे फोटो कोटा रेल्वे स्थानकावरील नसल्याचे समोर आले. उलट हे फोटो जुने असून सोशल मीडियावरुन प्रसारित करण्यात आल्याचे आढळले. एबीपी न्यूजच्या या पडताळणीत हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे आढळून आले आहे.