नवी दिल्ली : भारतीय लष्कराकडे सध्या उपलब्ध असलेल्या दारुगोळ्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये जोरदार गोंधळ पाहायला मिळत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे लष्कराकडे दारुगोळ्याची कमतरता आहे, असा आरोप सपाचे खासदार रामगोपाल यादव यांनी 'कॅग'च्या अहवालाचा हवाला देत केला आहे.


हा आरोप बेजबाबदार असल्याचा दावा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केला. जेटलींनी रामगोपाल यादव यांचे सर्व आरोप फेटाळले. भारताकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा आहे. देशाला चिंता करण्याची गरज नाही, असं अरुण जेटली म्हणाले.

काय आहे 'कॅग'चा अहवाल?

तीन दिवसांपूर्वी समोर आलेला 'कॅग'चा अहवाल दोन्ही सभागृहातील गोंधळाचं मूळ कारण आहे. भारताकडील 40 टक्के दारुगोळा युद्धाच्या परिस्थिती पहिल्या दहा दिवसांमध्ये संपून जाईल. तर युद्धात 70 टक्के टँक आणि 44 टक्के तोफा दहा दिवसात संपतील, असं 'कॅग'च्या अहवालात म्हटलं होतं. मात्र युद्ध परिस्थितीत कमीत कमी 40 दिवस पुरेल, एवढा दारुगोळा उपलब्ध असणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.