नवी दिल्ली : सरकारने लग्नासाठी अडीच लाख रुपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता लग्नाला पैसे काढण्यासाठी सात अटी ठेवल्या आहेत. यामुळे लग्न असणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


नोटाबंदीमुळे ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे, त्यांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवरच सरकारने लग्न पत्रिका दाखवून अडीच लाख रुपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र आरबीआयने रोखीचा व्यवहार बंद करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकत नवी सूचना जारी केली आहे.

आरबीआयच्या सात अटी

  1. लग्न असणाऱ्यांना 30 डिसेंबरपर्यंत अडीच लाख रुपये काढता येतील. मात्र हे पैसे तुमच्या खात्यात 8 नोव्हेंबरपूर्वी जमा केलेले असावेत. 30 डिसेंबर किंवा त्यापूर्वी असलेल्या लग्नासाठीच हे पैसे काढता येतील.

  2. वर-वधू किंवा त्यांच्या आई-वडिलांनाच पैसे काढता येतील.

  3. वर आणि वधू वेगवेगळे अडीच लाख रुपये काढू शकतात.

  4. ज्या व्यक्तीला हे पैसे द्यायचे आहेत, त्यांचं बँकेत खातं नसावं. उदाहारणार्थ तुम्हाला केटरिंगला पैसे द्यायचे असतील तर त्यांचं बँकेत खातं नसणं गरजेचं आहे. केटरिंगवाल्याचं बँक खातं असेल तर त्याला तुम्ही चेक किंवा ऑनलाईन पेमेंट करु शकता.

  5. पैसे काढताना पुरावा म्हणून लग्न पत्रिका, लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची पावती दाखवावी लागेल.

  6. लग्न पत्रिकेसोबत वर आणि वधू यांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

  7. तुम्ही लग्नासाठी घरात पैसे जमवून ठेवले असतील आणि या जुन्या नोटा बदलून घेण्याचा विचार असेल तर तसं आता करता येणार नाही. बँड, मंडप, केटरिंगसह सर्व खर्चाची पावती दाखवणं आवश्यक आहे.