मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अखेर मौन सोडलं. गरज पडली तर शंकराप्रमाणे नीळकंठ होऊन विष पचवू, अशी प्रतिक्रिया पटेलांनी दिली.

नीरव मोदीनं 12 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना पंजाब नॅशनल बँकेला लावला आणि तो देशाबाहेर पळाला. हा देशाच्या भविष्यावरचा सगळ्यात मोठा दरोडा होता, असं म्हणत उर्जित पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गांधीनगरमध्ये गुजरात नॅशनल युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बँकिंग क्षेत्रातील प्रणाली सुधारण्यासाठी शंकराप्रमाणे नीळकंठ अवतार धारण करण्याचीही आमची तयारी आहे, असं पुराणकथेचा आधार देत उर्जित पटेल म्हणाले.

रिझर्व्ह बँकेने हा घोटाळा आधीच पकडायला हवा होता, असं म्हटलं जातं. त्यावर, एखादा बँक रेग्युलेटर फसवणूक पकडू शकत नाही किंवा थांबवूही शकत नाही, अशा असहाय्यताही उर्जित पटेलांनी व्यक्त केली.

सरकारी बँकांतून होणारे घोटाळे आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी, तसंच दोषींना शिक्षा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आणखी अधिकार देण्याची मागणी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी केली.