नवी दिल्ली : माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना जरी बिहारमधील पोटनिवडणुकीचा विजयी आनंद झाला असला, तरी आज त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. रांचीच्या सीबीआय कोर्टात आज चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी आहेत.


राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर 96 बनावट व्हाऊचर्सच्या द्वारे डिसेंबर 1995 ते जानेवारी 1996 या कालावधीत सरकारी तिजोरीतून 3 कोटी 76 लाखांची रक्कम अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे. प्राण्यांचा चारा, औषधं आणि शेतीचे साहित्य यांच्या वितरणाच्या नावाखाली हे पैसे काढले गेले. या घोटाळ्यावेळी लालू प्रसाद यादव बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री होते.

या प्रकरणात लालू प्रसाद यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह एकूण 31 आरोपी आहेत. लालू यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी सहा खटले सुरु आहेत. त्यातील तीन प्रकरणात लालू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लालू प्रसाद यादव यांना चाईबासा प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा, देवघर प्रकरणात साडेतीन वर्षांची शिक्षा आणि चाईबासातील दुसऱ्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लालू सध्या रांचीतील बिरसा मुंडे जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.