मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा करुन आज 20 दिवस झाले आहेत. पण यावरुन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आहे. पटेल यांनी देशाच्या परिस्थितीकडे बारकाईने नजर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


पटेल म्हणाले की, ''जनतेची समस्या सोडवण्यासाठी योग्य ती उपाय योजना करण्यात येत असून, प्रामाणिक ग्राहकांचा मनस्ताप कमी करण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे.''

चलनतुटवड्याच्या समस्येवर ते म्हणाले की, ''देशात चलनांची कमतरता पडू नये, यासाठी टाकसाळींमध्ये युद्धपातळीवर चलन छपाईचे काम सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही चिंता करु नये,'' असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यापासून देशभरातील बँकामध्ये मोठ्या रांगा दिसून येत आहेत. बँका आणि एटीएम सेंटरवरील गर्दीमुळे अनेक ठिकाणचे एटीएम खाली झाले आहेत. त्यावर रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत होता.

तसेच सोशल मीडियामधूनही उर्जित पटेलांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे नोटाबंदीच्या 19 व्या दिवशी उर्जित पटेल यांनी आपले मौन सोडल्याने जनतेमधून सुटकेचा निश्वास सोडला आहे.

तर दुसरीकडे चलनतुटवड्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नोटाबंदीविरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप यांच्यासह इतर पक्षांनी विरोधी भूमिका घेत उद्या सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.