चंदीगढ (पंजाब) : पंजाबमधला सर्वात सुरक्षित मानला जाणारा जेल म्हणजे नाभा. पण याच जेलमधून कुख्यात दहशतवाद्यांनी पलायन केलं. दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या परमिंदर सिंहला उत्तर प्रदेशच्या शामलीमधून अटक करण्यात आली आहे. तर अतिरेकी समजून एका निष्पाप तरुणीवर पोलिसांनी केेलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला आहे.
पलायन केलेल्या कैद्यांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यात एका दहशतवदी संघटनेच्या म्होरक्याचाही समावेश आहे. एकूण 5 जणांनी तुरुंगात पोलिसांच्या वेशात प्रवेश केला. त्यातल्या एकानं बेड्याही ठोकल्या होत्या. पण जेलमध्ये प्रवेश करताच पाचही जणांनी फायरिंग सुरु केली.
बंदुकीच्या धाकानं या पाच जणांनी 6 कैद्यांना फरार केलं आणि भरधाव वेगाने पळ काढला. फरार झालेल्या अतिरेक्यांमध्ये 2014 साली अटक झालेल्या हरमिंदरसिंह मिंटूचाही समावेश आहे.
47 वर्षीय हरमिंदरसिंह मिंटूवर डेरा सच्चा सौदाच्या राम रहीम यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. 2010 मध्ये हलवाडा हवाई तळावर स्फोटकं पेरल्याचा त्याचावर आरोप आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा तो प्रमुख आहे.
खलिस्तान चळवळीसाठी निधी गोळा करण्याचं काम तो करतो. खलिस्तानी संघटनेत तरुणांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेटचा पुरेपुर वापर तो करतो. एकूण 10 दहशतवादी कारवायांप्रकरणी तो अटकेत होता.
एकीकडे दहशतवादी तर पसार झाले. पण पंजाब पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यानही एक धक्कादायक घटना घडली. अतिरेकी समजून एका निष्पाप तरुणीवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या.
महिन्याभरापूर्वी भोपाळमधून 6 अतिरेक्यांनी पलायन केलं. पण 24 तासात त्यांचा खात्मा झाला. आता एका दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हातावर तुरी देऊन पळाला आहे. त्यामुळे जेलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा आ वासून उभा राहिला आहे.