मुंबई : शरीरसौष्ठवाचे मुख्य केंद्र ठरत असलेल्या फिट भारताचा 60 जणांचा पिळदार संघ जग जिंकायला निघाला आहे. गेले चार महिने घेतलेल्या परिश्रमाचे चीज करण्यासाठी किरण पाटील, जगदीश लाड, बॉबी सिंग, बी. महेश्वरनसारखे जबरदस्त तयारीचे खेळाडू थायलंडमधील पट्टाया येथे होणाऱ्या आठव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
येत्या 1 ते 4 डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताचा जम्बो संघ आजवरची सर्वात मोठी कामगिरी करुन दाखवेल, असा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केला आहे.
भारताचा बलाढ्य चमू पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने उतरत असल्यामुळे अनेक गटांमध्ये पदकाची आशा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेसाठी जगभरातील 57 देशांमधील 500 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे.
पदकांसाठी इराण, थायलंड, चीन आणि भारताच्या शरीरसौष्ठवपटूंमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळणार यात तीळमात्र शंका नाही. दोन वर्षांपूर्वी भारताने मिस्टर वर्ल्ड स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करुन शरीरसौष्ठवात भारताची वाढती ताकद अवघ्या जगाला दाखवून दिली होती. यंदा इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भारतीय शरीरसौष्ठवपटूंची ताकद
आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.
गेल्या वर्षी झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेतही भारतानं चार सुवर्णांसह अकरा पदके जिंकली होती. भारतीय संघाची तयारी पाहून भारताला सुवर्णासह किमान 15 पदके हमखास मिळतील असा विश्वास पाठारे यांनी व्यक्त केला आहे.
यंदा भारतीय महिला शरीरसौष्ठवपटूंनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे महिला गटात भारतीय स्पर्धक दिसू शकतील. फिजीक फिटनेस प्रकारात सोनिया मित्रा तर शरीरसौष्ठव स्पर्धेत सरिता देवी, ममोता देवी, रबिता देवी आपले कौशल्य पणाला लावतील. एकूण विविध गटात भारताच्या सात महिला खेळणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी भारतीयांना फिजीक फिटनेस हा शब्दही माहित नव्हता. मात्र आता चित्र वेगळे आहे. या प्रकारात भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त आव्हान निर्माण केले आहे. गेल्या वर्षी याच प्रकारात अनुप सिंगने सुवर्ण पदक जिंकून भारताचा तिरंगा फडकावला होता. यावेळी मनोहर पाटील, मंगेश गावडे, सनी रॉयसारखे खेळाडू पदक जिंकण्याची क्षमता बाळगून आहेत. या प्रकारात भारताचे 11 खेळाडू आपले नशीब आजमावतील.