नवी दिल्ली : अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालचा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हवाई दौरा करणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये 72 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेण्याचं आवाहन करणार असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.


अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाची स्थिती पाहून पंतप्रधानांनी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल अशी इच्छा व्यक्त केली.


ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्या भावना ओडिशाच्या जनतेबरोबर आहेत. राज्य मोठ्या धैर्याने अम्फान चक्रीवादळाच्या परिणामांना सामोरे जात आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी प्रशासन प्रत्यक्ष काम करत आहे. मी प्रार्थना करतो की परिस्थिती लवकरच सामान्य होईल.





चक्रीवादळचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि पश्चिम बंगाल सरकारशी समन्वयाने काम करत आहेत. पीडितांना मदत करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही.





चक्रीवादळ अम्फानमुळे पश्चिम बंगालमधील विध्वंसाची दृश्ये पहात आहे. या आव्हानात्मक काळात संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.





म्हणून मनुष्यहानी टळली
ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी सांगितले, की हवामान खात्याने योग्य वेळी इशारा दिला. त्यामुळे एनडीआरएफच्या मदतीने पश्चिम बंगालमधील सुमारे पाच लाख नागरिक आणि ओडिशामधील सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी टळल्याचे ते म्हणाले. योग्यवेळी हालचाली केल्याने मनुष्यहानी कमी झाली. ओडिशामध्ये 1999 साली झालेल्या चक्रीवादळानंतर 'अ‍ॅम्फान' सर्वात भयंकर आणि भयानक होतं, अशी माहिती निवेदनात दिली आहे.

Cyclone Amphan | अॅम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याचा अंदाज : हवामान विभाग

हवामान विभागाचा इशारा काय होता?

अॅम्फानचं केंद्र पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत होतं, जे पारादीप (ओदिशा) पासून सुमारे 420 किलोमीटर दक्षिण, दीघापासून 570 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि बांगलादेशच्या खेपुपारापासून 700 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम भागात आहे, अशी माहिती भुवनेश्वर हवामान केंद्राचे संचालक एच आर विश्वास यांनी मंगळवारी सकाळी दिली होती.
ते म्हणाले की, "चक्रीवादळ अंशत: कमकुवत झालं आहे. हे वादळ उत्तर-उत्तरपूर्वच्या दिशेला बंगालच्या खाडीवर पोहोचण्याची आणि बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशमधील हटिया बेटावरुन जाण्याची शक्यता आहे. या वादळाच्या वेळी हवेचा वेग 155 ते 165 किलोमीटर प्रतितास कायम राहिल. तर अधूनमधून हा वेग 180 किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढू शकतो."
Cyclone Amphan | अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं