मुंबई : जर तुम्ही स्टेट बँकेत नोकरीसाठी अर्ज करणार असाल तर त्यापूर्वी तुम्ही आपला सिबिल स्कोअर जाणून घेणं गरजेचं आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर पुरेसा समाधानकारक नसेल तर सर्व प्रकारची गुणवत्ता असूनही तुम्ही आपोआप अपात्र ठरू शकता.


 
एसबीआयमध्ये सध्या ज्युनिअर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) आणि ज्युनिअर अॅग्रीकल्चरल असोसिएट्स या क्लार्कवर्गीय पदांसाठी नोकरभरतीची जाहिरात जारी केलीय. मात्र तुमचं सिबिल रेकॉर्ड चांगलं नसेल तर तुम्हाला अपात्र ठरविण्यात येईल, असा नवा निकष यावेळी या नोकरभरतीत वागू करण्यात आलाय.

 

 

काय असतो सिबिल स्कोअर?

 
तुम्ही पर्सनल लोन घेऊन त्याची वेळेवर परतफेड केली नसेल किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याचे काही हफ्ते चुकले असतील तर तुमचा सिबिल क्रेडिट स्कोअर प्रभावित होऊ शकतो, आणि तुमच्याकडे संबंधित पदासाठी गुणवत्ता असूनही तुम्ही आपोआप स्पर्धेतून बाहेर फेकलं जाण्याची शक्यता आहे.

 
स्टेट बँकेने ज्युनिअर असोसिएट्स आणि ज्युनिअर अॅग्रीकल्चरल असोसिएट्स या दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड म्हणजेच सिबिल स्कोअर तपासून त्याचा उल्लेख करण्याची अट घातलीय.

 
मात्र ज्या उमेदवारांनी शैक्षणिक कर्ज घेतलं आहे, त्यांना या निकषातून वगळावं अशी मागणी कामगार संघटनांनी स्टेट बँक व्यवस्थापनाला केलीय.