नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर काळ्याचं पांढर करणाऱ्यांसाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा आधार घेणाऱ्यांना 7 वर्षे जेलची हवा खावी लागणार आहेत. काळी संपत्ती दडवणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आयकर विभागानं हे पाऊल उचलल्याचं समजतं आहे.


नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रॅन्झॅक्शन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. 7 वर्षाच्या शिक्षेशिवाय दुसऱ्याच्या खात्यात टाकण्यात येणारी रक्कम जप्त केली जाईल आणि त्या रक्कमेच्या 25 टक्के इतका दंडही आकारला जाईल.

दरम्यान नोटबंदीच्या घोषणेनंतर काळी संपत्ती लपवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवली जाते आहे. अनेकजण ओळखींच्या व्यक्तींच्या बँक खात्यात रक्कम भरून काळ्याचं पांढर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आयकर विभागानं सर्जिकल स्ट्राईक करत या सगळ्या प्रकाराला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे.

काळ्या पैशाविरोधात लढाईला बळ मिळावं म्हणून केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या. शिवाय, जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासंदर्भातही असे नियम जाहीर केले, ज्यामुळे काळा पैसा असणाऱ्यांचे धाबे दणाणाले आहे.