मुंबई : आयसिसमध्ये सामील होण्यासाठी तरुणांना चिथावणी देणाऱ्या झाकीर नाईकनं भारतात परतणं लांबणीवर टाकल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. देशभरातील अनेक तरुणांचं धर्मांतरण करुन झाकीरनं त्यांना दुसऱ्या मार्गाला लावल्याचा आरोप आहे.
राजस्थानातील रावल कुटुंबामधल्या संदीपलाही झाकीरनं आपल्या जाळ्यात ओढलं. आता त्याचे वृद्ध आई-वडिल 'मेरा बेटा मुझे लौटा दो' अशी आर्त हाक देत आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी आई आपला एकुलता एक मुलगा परत मिळावा म्हणून झाकीर नाईककडे आर्त हाक देत आहे. असा कुठला धर्म आहे जिथं म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून जायला सांगितलं जातं, बुढापे की लाठी कौन होगा, असं त्याची आई विचारते.
आपल्या मुलासाठी दिवसरात्र रडणारी ही आई आहे उगम रावल. राजस्थानमधील लाटाडा गावात त्यांचं छोटंसं कुटुंब आहे. पती पुरुषोत्तम रावल कपड्याचा छोटा व्यवसाय करतात. आपला एकुलता एक मुलगा संदीपने वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या प्रभावाखाली येऊन मुस्लिम धर्म स्वीकारला, असा आरोप वृद्ध माता-पित्याने केला आहे.
धर्मांतरानंतर संदीपनं नामांतर केलं. अब्दुल रहमान या नावानं तो जगत आहे. गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलाचा ठावठिकाणा या आई-वडिलांना माहित नाही. 2005 साली पुरुषोत्तम रावल यांनी संदीपला बंगळुरुमध्ये आपल्या मित्राकडे पाठवलं. कॉम्प्युटर हार्डवेअरच्या दुकानात काम करुन कुटुंबाला हातभार लावावा अशी त्यांची इच्छा होती. संदीप इलेक्ट्रॉनिक्सचं काम शिकला. काही वर्षे त्यानं कुटुंबीयांना पैसे पाठवले. सर्वकाही आनंदात सुरु होतं. मात्र याच काळात संदीपची मैत्री कथित मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या पंटरशी झाली.
रावल कुटुंबीयांच्या दाव्यानुसार इमरान खान झाकीर नाईकच्या व्हिडिओद्वारे संदीपचं मनपरिवर्तन करत होता. इमरान खानचं बंगळुरुच्या एसपी रोडवर कॉम्प्युटरचं दुकान होतं. तिथं संदीप आणि इमरानची ओळख झाली. मग इमराननं झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून संदीपला मुस्लीम धर्माच्या जाळ्यात ओढलं.
याच काळात आई वडिलांनी संदीपला लग्नाच्या बेडीत अडकवलं. तोपर्यंत संदीप पूर्णपणे झाकीर नाईकच्या प्रभावाखाली आला होता. त्यानं हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारला. मात्र रावल कुटुंबाला त्याचा थांगपत्ताही नव्हता. मात्र संदीपने आपल्या पत्नीकडे सातत्यानं धर्मांतर करण्याचा आग्रह केला. ही गोष्ट संदीपच्या पत्नीनं कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर वडील पुरुषोत्तम रावल यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
संदीपनं मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतर पत्नीनं त्याची साथ सोडली. संदीपनं एका मुस्लिम मुलीसोबत संसार थाटला. तिच्यापासून संदीपला दोन मुलं झाली. बंगळुरुच्या जे. सी. नगरमध्ये संदीप भाड्याच्या घरात राहत होता.
गेल्या वर्षी संदीपनं वडिलांना फोन करुन कुटुंबीयांकडे धर्मांतरण करण्याचा आग्रह केला होता. त्यासाठी नातेवाईकांना एकत्र करुन त्यांच्यासमोर मुस्लीम धर्माचा प्रसार करणार असल्याचं सांगितलं. या निमित्तानं मुलगा घरी येतोय म्हणून रावल कुटुंब तयार झालं.
संदीप घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला समजावून सांगितलं. पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा आग्रह केला. कुटुंब आणि नातेवाईकांच्या दबावात येऊन संदीपनं हिंदू धर्म स्वीकारल्याचं शपथपत्र लिहून दिलं.
कागदोपत्री जरी संदीप हिंदू असला तरी प्रत्यक्षात संदीपनं स्वत:ला हिंदू म्हणून घेण्यास नकार दिला. आता तर त्यानं आई वडिलांनाही मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा आग्रह केला आहे. घरात पूजा-अर्चा, देव-देवतांचे फोटो लावण्यास संदीपनं विरोध केला आहे. एवढंच नाही तर आईला बुरखा घालण्याचा आग्रहसुद्धा संदीप करत आहे. मात्र आई-वडिल काही हिंदू धर्म सोडायला तयार नव्हते. त्यामुळे एक दिवस अचानक संदीप घर सोडून निघून गेला. आपल्याला कुणी शोधू नये यासाठी त्यानं मोबाईलचं सीमकार्डही तोडून टाकलं.
संदीपच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिलीय. घरातून जाताना संदीपनं 45 हजारांची रोकडही लंपास केली. मात्र मुलाला परत मिळवण्यासाठी पैसे चोरीला गेल्याची खोटी तक्रार केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी आम्ही सादडी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला. पण पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. मात्र आम्ही चौकशी केली असून संदीप बंगळुरुमध्येच आहे, मात्र कायद्यानुसार पोलीस त्यांची घरवापसी करु शकत नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे. संदीपचा शोध घेत आम्ही बंगळुरुमध्ये पोहचलो. संदीपनं पासपोर्टवर जो पत्ता दिला तिथं जाऊन शोध घेतला. मात्र संदीप तिथं सापडला नाही. काही वर्षापूर्वी तो इथं भाड्यानं राहायचा. घरमालकाच्या दाव्यानुसार तो सौदी अरबमध्ये जाऊ इच्छित होता.
संदीपचा शोध घेत आम्ही एसपी रोडवरील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये पोहोचलो. ज्यानं संदीपचं धर्मांतरण केलं. त्या इमरानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वर्षांपूर्वीच इमराननं दुकान विकलं आहे. कित्येक तासांच्या प्रयत्नानंतर आम्हाला इमरानचा मोबाईल नंबर मिळाला. फोनवरुन त्यानं आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
कायदेतज्ज्ञांच्या मते संदीपनं धर्मांतरण करुन कुठलाही गुन्हा केला नाही. पण पत्नी, आई वडिलांना जबरदस्तीनं धर्मांतरण करायला सांगणं हा गुन्हा आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पोलिसांनी संयुक्त करवाई करत आर्शी कुरेशी आणि रिझवान खानला अटक केली. कुरेशी झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनसाठी गेस्ट रिलेशन ऑफिसर म्हणून काम करत होता. कुरेशीनं पाठवलेल्या लोकांचं धर्मांतरण करण्यासाठी कायदेशीर कारवाई पूर्ण केल्याचा आरोप रिझवानवर आहे. त्यासाठी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन कडून त्यांना आर्थिक मदत मिळत होती.
इतकंच नाही तर धर्मांतरण केलेल्या व्यक्तींना आयसिसमध्ये भरती होण्यासाठी गळ घालत असल्याचाही दोघांवर आरोप आहे. मात्र इस्मामिक रिसर्च फाऊंडेशनं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.