नवी दिल्ली : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. 16 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला पेटवल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मुलीवर बलात्कार करुन तिला पेटवल्याचा आरोपा या दोघांवर आहे. मुलीच्या आईला गुरुवारी तिचा जळालेला मृतदेह सापडला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं पोलिसांचा अंदाज होता. पण ऑटोप्सीमध्ये हत्येचा खुलासा झाला आहे.
काय आहे प्रकरण?
पूर्व दिल्लीतील गांधीनगरचं हे प्रकरण आहे. 28 जुलै रोजी घरात एकटी असताना दोन्ही नराधमांनी तिच्यावर बलत्कार केला आणि नंतर तिला जाळलं. मुलीच्या एका मैत्रिणीच्या जबाबानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
हे आरोपी मागील काही दिवसांपासून मृत मुलीचा पाठलाग करत होते. इतकंच नाही तर दोघांनी मुलीची छेडछाडही केली होती. या नराधमांनी बलात्कार झाल्याचं लपवण्यासाठी मुलीच्या शरीराचा खालचा भाग जाळला.
पोस्टमॉर्टेम अहवालात गळा दाबून मारल्याचा खुलासा
मुलीला पेटवण्याआधी गळा दाबून तिला मारलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. शवविच्छेदन अहवालातही या गोष्टीचा खुलासा झाला आहे.
मैत्रीस नकार दिल्याने आरोपींचं क्रूरकृत्य
मृत मुलीने आशू आणि दानिश या दोन्ही आरोपींचा मैत्रीचा प्रस्ताव धुडकावला होता. तेव्हापासून हे नराधम मुलीला त्रास देत असल्याचं तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. शिवाय दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.