नवी दिल्ली : मुस्लीम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असं वक्तव्य करुन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवा वाद निर्माण केला आहे. देशाची संस्कृती आणि विविधता यावर विकासाचा होणारा परिणाम, या विषयावरील 'माईंड माइन' संमेलनात रविशंकर प्रसाद बोलत असताना त्यांनी हे विधान केलं.


रविशंकर प्रसाद म्हणाले की, ''देशातील 13 राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही देशाचा कारभारही चालवतो आहोत. अशावेळी, उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला आम्ही त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना बडतर्फ केलं आहे का? आम्हाला मुस्लीम लोक मतं देत नाहीत, हे मला मान्य आहे. पण आम्ही त्यांना न्यायानंच वागवतोय की नाही?,'' असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी केला.

''भाजपच्या विरोधात बऱ्याच काळापासून बदनामीची मोहीम राबवली जात आहे. पण देशातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सरकारमध्ये आहोत आणि इथल्या संस्कृती, विविधेतेला आम्ही वंदन करतो,'' असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. प्रसाद यांच्या वक्तव्याचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ''आम्हाला घटनेनं अधिकार दिले आहेत. सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे,'' असं ओवेसी म्हणाले आहेत.

काँग्रेसनंही प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी, ''भाजपनं यापूर्वी मुस्लीम महिलांनी आम्हाला मतं दिल्याचं म्हणलं होतं. तर मग आता रविशंकर प्रसाद असं वक्तव्य का करत आहेत?'' असा सवाल उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. रविशंकर प्रसाद यांनी काहीही चुकीचं म्हणलं नसल्याची प्रतिक्रिया गिरीराज सिंह यांनी दिली आहे.


दरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागताच त्यांनी ट्वीट करुन सारवासारव केली आहे. ''सर्व भारतीय सारखेच आहेत. विकास हाच आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील वैविध्यतेनं नटलेल्या संस्कृतीचा आम्ही आदर करतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये,'' असंही त्यांनी या ट्वीटद्वारे स्पष्ट केलं आहे.