गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तालिबानी सरकारनं आम्हाला आंदोलनापासून रोखलं, गुजरातचे पोलीस चांगले, पण त्यांच्यावर मोदींचा दबाव आहे, अशा शब्दात प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी निशाणा साधला.

दरम्यान बच्चू कडू यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

आसूड यात्रे अंतर्गत सीएम टू पीएम यात्रेसाठी बच्चू कडू वडनगरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमी भाव द्यावा यासाठी बच्च कडू आणि रघुनाथदादा पाटील यांनी आसूड यात्रा काढली.

गुजरातमध्ये मोदींचा दबाव - बच्चू कडू 

"गुजरातमध्ये मोदींचा प्रचंड दबाव आहे. तालिबानसारख्या सरकारमुळे इथे कोणीही शेतकऱ्यांबाबत आवाज उठवत नाही. आम्ही इथे अनेक संघटनांना भेटलो, पण कोणाचंही आंदोलन करण्याचं धाडस नाही.

आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक

पोलीस चांगले आहेत, पण मोदींचं प्रेशर आहे. इंग्रजांप्रमाणे वागणं आहे. इथे नेहमीच संचारबंदी असते. हार्दिक पटेलचं आंदोलन ज्याप्रमाणे ठेचण्यात आलं, तसंच काहीसं सर्व आंदोलनात केलं जातं", असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडूंना अटक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सीएम टू पीएम आसूड यात्रा काढणाऱ्या आ. बच्चू कडू यांना गुजरात पोलिसांनी काल अटक केली होती. वडनगरमध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

आमदार बच्चू कडूंची गेल्या 15 दिवसांपासून सीएम टू पीएम आसूड यात्रा सुरु आहे. गुरुवारी त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर आडवलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अडवणुकीचा निषेध केला. पण आज आ. बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये प्रवेश करुन वडनगरजवळ निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दरम्यान, यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी गुजरात पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. अहमद पटेल यांनी ट्विट करुन सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत नसल्याचं म्हणलं आहे.

संबंधित बातम्या

बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा गुजरात सीमेवर रोखली!


सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना बच्चू कडूंची जीभ घसरली

हेमामालिनी रोज बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का? : बच्चू कडू

आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक